आयुष्यात यशस्वी होण्यासाठी जशी जिद्द कष्ट उपसण्याची क्षमता लागतेच, त्याचबरोबर तुमची सकारात्मक मानसिकता ही फार उपयोगी पडते. तुमच्याकडे सकारात्मक विचार नसेल तर तुम्ही कुठेच यशस्वी होणार नाही. ज्याला प्रत्येक बाबतीत नकारघंटा दिसते तो माणूस कितीही काबाड कष्ट उपसले तरी यशस्वी होऊ शकत नाही एखाद्या तरुणाने जर मनाशी नोकरी न करण्याची खूणगाठच बांधली व व्यवसाय करण्याचे व्रत घेतले तर तो जरूर यशस्वी होतो. धंद्यात खोट आली तर तो त्यातून सावरून दुसऱ्या व्यवसायात यशस्वी होतो, असा अनुभव आहे. पण तो उद्योगधंदाच करतो. नोकरी करीत नाही. अशा प्रकारे तुमच्या मनाने एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतला तर जीवनात यशस्वी होणे काही कठीण नाही. त्याच्या जोडीला तुम्हाला यश पदरात पाडून घेण्यासाठी काही छोट्या बाबी अंगवळणी पाडून घेणे महत्त्वाचे असते. त्यातील दोन महत्त्वाच्या बाबी म्हणजे मित्र जोडण्याची कला व नेहमी मिठास बोलणे. अर्थात या सोप्या बाबी नाहीत. कुणाशीही मैत्री करण्यासाठी तुम्हाला समोरच्याचा समोरच्याचा किती राग आला तरी तो गिळण्याची कला अवगत झाली पाहिजे. राग, लोभ, मत्सर या तिघांवर तुम्ही मात केली की जीवनात यशस्वी होण्याचा किंवा एक चांगला माणूस म्हणून नावलौकिक कमावण्याचा तुमचा मार्ग खुला झाला म्हणूनच समजा. प्रसिद्ध सक्सेस काऊन्सेलर व या पुस्तकाचे लेखक विलास मुणगेकर यांनी दै 'लोकसत्ता' त प्रसिद्ध झालेल्या या लेखांच्या मालिकेद्वारे याबाबत युक्तीच्या चार गोष्टी सांगितल्या आहेत. लोकसत्तातील ही मालिका अल्पावधीत बरीच लोकप्रिय झाली. याचे सर्व श्रेय विलास मुणगेकर यांनाच आहे. हे लेख त्यांनी अतिशय सोप्या भाषेत, मनाला भावतील अशा शब्दांत वाचकांपुढे सादर केले मुणगेकर हे स्वतः उत्कृष्ट वक्ते आहेत. आज महाराष्ट्रात त्यांनी हजारो लोकांना प्रेरणादायी मार्गदर्शन करून आयुष्याची दिशा दाखवली आहे. लोकसत्ता मध्ये प्रकाशित झालेले काही लेख पुस्तक रूपाने वाचकांपुढे सादर करून विचारधनाचा एक साठाच ठेवला आहे. या पुस्तकातून अनेकांना आयुष्याची नवी दिशा मिळू शकते. प्रत्येकाच्या संग्रही असावे असेच हे पुस्तक आहे. मुणगेकर यांनी पुस्तक रूपाने दिलेले हे विचारधन आत्मसात केल्यास कुणीही आयुष्यात यशस्वी होऊ शकतो, याची मला खात्री आहे आपण याचा जरूर अनुभव घ्यावा.
please login to review product
no review added