नोकरी करणाऱ्या विशेषत: मोठ्या पदावर नोकरी करणाऱ्या लोकांचा बराचसा वेळ ऑफिसच्या कामात जातो. त्यात ऑफिसमध्ये जाणं आणि परत घरी येणं या वेळेचाही समावेश असतो. ऑफिस घरापासून लांब असेल, तर जाण्या-येण्यात माणूस दमून जातो. त्याला कुटुंबासाठी वेळ देता येत नाही. तो अन्य कोणत्या गोष्टींचा आस्वाद घेऊ शकत नाही; पण घरात बसून जागतिक दर्जाच्या कंपनीबरोबरही किती सहजपणे काम करता येतं, याचा आदर्श वस्तुपाठ म्हणजे – ‘देवाजीचं ऑफिस’ हे पुस्तक. जेम्स जोसेफ यांनी या पुस्तकाद्वारे स्वत:चे अनुभव लोकांपर्यंत पोहोचवले आहेत. इंग्लंडसारख्या ठिकाणी शिक्षण घेऊन, इंग्लंड, अमेरिकेसारख्या प्रगत देशांमध्ये चांगल्या कंपनीत उच्च पदावर काम केल्यानंतर जोसेफ यांना भारतात केरळमध्ये आपल्या मूळ गावी परतावे, असे वाटू लागले. म्हणून त्यांनी त्यासाठी काय पूर्वतयारी केली, आपल्या छोट्याशा गावातून त्यांनी काम कसे सुरू केले, त्यात येणाऱ्या अडचणी गृहीत धरून त्यावर मात करण्यासाठी काय उपाययोजना केल्या, त्यांच्या निसर्गसंपन्न गावातील त्यांचं दैनंदिन, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक जीवन कसं आहे इ. बाबींचं निवेदन जोसेफ यांनी या पुस्तकातून केलं आहे. हे पुस्तक म्हणजे तंत्रज्ञानाच्या युगात स्वत:चं भावविश्व कसं जपावं आणि ते व्यापक कसं करावं, याचंही जाता जाता मार्गदर्शन करून जातं. जोसेफ यांची पत्नी डॉक्टर आहे. त्यामुळे तिला व्यवसायाबरोबरच सेवाभावही जपता येतो. त्यांच्या पत्नीची डॉक्टरीची पदवी परदेशातील असल्यामुळे भारतात प्रॅक्टिस सुरू करण्यात तिला आलेले अडथळे आणि त्या अडथळ्यांवर जोसेफ यांनी केलेली मात, याचाही उल्लेख या पुस्तकात आला आहे. त्यांच्या मुलींचं शालेय जीवन, जोसेफ यांचं कौटुंबिक जीवन याचंही अगदी हलक्याफुलक्या शैलीत ते वर्णन करतात.
please login to review product
no review added