पेकिंग १९१४. प्रिन्स सू यांच्या सगळ्यात लहान उपस्त्रीची आठ वर्षांची मुलगी ईस्टर्न ज्युवेलने तिच्या वडिलांची त्यांच्या एका नोकराणीशी चाललेली रतिक्रीडा एका कोरीव आडोशामागून चोरून बघितली. त्यानंतर भविष्याच्या कृष्णच्छायांचं मळभच जणू दाटून आलं आणि ईस्टर्न ज्युवेलच्या वादळी आयुष्याचा प्रवास सुरू झाला... ईस्टर्न ज्युवेलचा शरीरसंबंधांमधला चौकसपणा लक्षात आल्यामुळे तिला टोक्योला त्यांच्याच एका दूरच्या नातेवाइकाकडे पाठवून देण्यात आलं. त्यानंतर वैराण आणि बर्फाळ अशा मंगोलियातल्या राजकुमाराशी तिचा तिच्या इच्छेविरूद्ध विवाह करून देण्यात आला. वारंवार एकटेपणामुळे तिला अस्वस्थ करणारे चमत्कारिक आभास आणि तशीच दु:स्वप्नं पडू लागली; पण ती स्वभावत:च धीट, बंडखोर आणि कोणाच्याही, कमीत कमी पुरुषांच्या तरी वर्चस्वाखाली राहण्याची तयारी नसलेली अशी होती. शांघायच्या झगमगत्या शहरात तिने तिच्या धाडसी स्वभावाचा उपयोग जपानसाठी गुप्तहेरगिरी करण्यात केला. त्यासाठी तिने स्वत:ची चिनी वंशपरंपरा आणि तिला एकेकाळी जे जे प्रिय होतं, त्या त्या सगळ्याला तिलांजली दिली. ‘द प्रायव्हेट पेपर्स ऑफ इस्टर्न ज्युवेल’ ही अतिशय वादळी, बहुरंगी, दुसरे महायुद्ध आणि तीन देशांच्या पाश्र्वभूमीवर घडलेली सत्यकथा आहे.
please login to review product
no review added