आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कवी, लेखक, दिग्दर्शक गुल़जार यांचा हा पहिलाच लघुकथा-संग्रह. या चतुरस्र लेखकाच्या अभिजात सर्जनशक्तीचा हा निळ्या मखमलीवर ठेवलेल्या पाणमोत्यासारखा विलक्षण मनोज्ञ असा आविष्कार आहे. त्यांच्या मिताक्षरी शैलीतल्या निवेदनात घटनांश, प्रत्यक्ष घटना आणि मनोवस्था यांप्रमाणे बदल घडत राहतो. अभिजात प्रतिभेच्या बळावर गुल़जार वैश्विक पातळीवर जाऊ शकतील, अशी कथासूत्रं गुंफतात, आपल्या दृष्टीसमोर घडणा-या दैनंदिन घटनांची विलक्षण वास्तव पाश्र्वभूमी उभी करतात आणि संवादपूर्ण शैलीने वाचकांच्या थेट काळजाला हात घालतात. अपारंपरिक कथनशैली, चित्रदर्शी स्मरण आणि अभिजातता ही त्यांची वैशिष्ट्यं आहेत. जगण्यातील भेदक सत्य आणि वास्तव ते अत्यंत संवेदनशीलतेनं आणि प्रामाणिकपणानं मांडतात. कधी या कथा गंभीर वाटतात, कधी हलवून सोडतात, कधी हास्याचा शिडकावा करतात, तर कधी औपरोधिक वाटतात. या कथांतून जगाकडं अत्यंत समतोल दृष्टीनं आणि कणवेनं पाहणा-या गुल़जारांच्या समृद्ध आकलनशक्तीची प्रचीती येते. म्हणूनच सोनटक्क्याच्या फुलांसारख्या त्या सतत टवटवीत वाटतात.
please login to review product
no review added