अनेक, अनंत भेटींचा आल्हाद देणारी ही ’आनंद भेट’. क्षितिजांच्या दोन कडा, दोन देशांच्या साहित्यिक संस्कृती आणि दोन भाषांचे खळाळते प्रवाह या ठिकाणी सामोरे येत आहेत. तेजोमय सूर्यगोलाची ही दोन प्रतिबिंबं. एकामध्ये सामावलेला आहे, आपल्या ज्ञानोबा माउलीचा चिरंतन वारसा, तर दुसर्यामध्ये विसावलेले आहेत महाकवी पूश्किनचे अजरामर शब्द-संस्कार. या भेटीच्या मुहूर्ताला ज्यांनी आनंदाचं तोरण बांधलेलं आहे, त्यात लहानगा ’कमारव’ आहे. वडिलांच्या शोधात असलेला चार वर्षांचा ’वोवा’ आहे. आपल्या विवाहाच्या आनंदात अवघ्या विश्वाला सामावून घेणारे ’इलियास आणि आसेल’ आहेत; खरा विजेता कोण आहे, हे परीक्षकांशिवाय सिद्ध करणारा जातिवंत शिल्पकार आहे. अपूर्व निष्ठेनं दुखणाईत पतीच्या बिछान्यालाच आपलं जीवित अर्पण केलेली ’तान्या’ आहे आणि ’पतीचं वाण’ सांभाळण्यासाठी आपल्या देहाची आहुती देणारा ’नेइमरासही’ आहे. राजकीय आणि व्यावसायिक स्तरांवर अशा भेटी नेहमी होताच असतात, पण दोन भाषांचा हा ’प्रीति-संगम’ विशेष सुखदायी वाटणारा आहे. या संगमापाशी उभे आहेत या कथांचे मूळ जनक, त्यांचा संदेश आपल्यापर्यंत पोहोचविणारे ’गुरुजन’ आणि त्यांचे तेवढेच निष्ठावान ’अर्जुन’- जे या भेटीचं खरं कारण आहेत, प्रयोजन आहेत आणि अथांग, असीम आनंदाचा महासागरही...
please login to review product
no review added