‘अ इयर बाय द सी’ ही कथा आहे लेखिका जोआन आणि तिचा पती यांच्या नात्याची. विरत चाललेलं पती-पत्नीमधील नातं एका अशा वळणावर येतं की, जिथं या नात्याची सांगता होऊ शकेल. त्या वेळी लेखिका जोआन निर्णय घेते तो घटस्फोट न घेता वेगळं राहण्याचा. थोडक्यात, या नात्यात एक ‘ब्रेक’ घेण्याचं ती ठरवते. नवरा नोकरीच्या निमित्तानं वेगळ्या शहरात जाऊन स्थायिक होतो. त्या वेळी जोआन मात्र केपकॉर्ड या आपल्या मूळ गावी राहायला येते. जुन्या आठवणी मनात उजळत असतानाच तिची तिथल्या कोळ्यांशी मैत्री होते. समुद्रकाठी वसलेलं हे गाव निसर्गसौंदर्यानं नटलेलं असतं. स्वावलंबी होण्याच्या दृष्टीनं ती आपली लेखिका म्हणून असणारी प्रतिष्ठा विसरून ‘क्लॅम्प्स’ पकडण्याचे काम करू लागते. ‘जोआन एरिकसन’ नावाची एक मैत्रीणही तिला याच दरम्यान भेटते. त्या ठिकाणी तिला आपले वेगळं विश्व तयार झालं आहे आणि ते आपलं हक्काचं आहे, असं वाटू लागतं. ती या विश्वात आपलं स्वतंत्र अस्तित्व शोधू लागते. आपल्या दबलेल्या इच्छा- पुन्हा एकवार बालपण जगण्याची तिची ऊर्मी- उफाळून येते. याच दरम्यान ती आपल्या वैवाहिक जीवनाकडे तटस्थपणे बघू लागते. पती-पत्नीच्या नात्याकडे बघण्याचा वेगळा दृष्टिकोन तिला मिळतो. या वर्षभराच्या ‘ब्रेक’मध्ये तिला अनेक अनुभव येतात. हळूहळू पती-पत्नी दोघांनाही आपण काय हरवलं आहे किंवा आपल्याला नव्यानं काय गवसलं आहे, याचा गांभीर्यानं विचार करू लागतात. एका निर्मनुष्य बेटावर एक रात्र घालवून आपल्या ‘एकटेपणा’तली मजा उपभोगताना तिला आपल्या नवऱ्याविषयी असणाऱ्या भावना समजतात. पती-पत्नीचे काही काळानं गुळगुळीत, यांत्रिक होणारं नातं एखादा ‘ब्रेक’ घेऊन नव्या दमानं सुरू करण्यात असणारी मजा ही कथा सांगते.
please login to review product
no review added