स्त्रीवर लादलेले निकृष्ट जीवन हे एकूण भारतीय समाजाच्याच निकृष्टतेचे व दुरवस्थेचे एक अत्यंत महत्त्वाचे कारण आहे, हे काढी आता नव्याने सांगितले पाहिजे असे नाही. आजही हे चित्र फारसे पालटलेले नाही, ही बाबच खरी क्लेशकारक आहे. दररोजचे वर्तमानपत्र उघडले की वेगवेगळ्या कारणांनी व वेगवेगळ्या प्रकारांनी स्त्रियांचे खून करण्यात आल्याच्या चारदोन बातम्या निरपवादपणे वाचावयास मिळतात. वडिलांच्या गरिबीमुळे लग्न होऊ शकणार नाही, या विचाराने धास्तावलेल्या चार-चार बहिणींनी गळफास लावून घेतल्याच्या बातम्या येत आहेत. गर्भलिंगचाचणीचे खूळ बोकाळले आहे. दर १०० पुरुषांमागे स्त्रियांचे प्रमाण ९७ वरून ९३ वर आल्याचे संख्याशास्त्रज्ञ सांगत आहेत. काही भागांत स्त्रियांच्या साक्षरतेचे प्रमाण पाच टक्केही नाही आणि आता तर सतीच्या प्रथेचे अत्यंत उघडपणे आणि अभिमानानेही समर्थन व उदात्तीकरण केले जात आहे. या घटना भारतीय स्त्रीच्याच नव्हे, तर एकूण भारतीय समाजाच्याच भवितव्याविषयी चिंता निर्माण करणाऱ्या आहेत. प्राचीन काळापासून स्त्रीला हीन लेखण्याची प्रवृत्ती पुरुषांच्या अणू-रेणूमध्ये कशी रुजलेली आहे आणि त्या प्रवृत्तीमागे कोणत्या धार्मिक अंधश्रद्धा आहेत, हे जाणून घेतले असता त्या अंधश्रद्धा दूर सारून सध्याची परिस्थिती पालटण्यास मदत होईल. आजवर झालेले लिखाण हे ब्रिटिश वसाहतवादाला उत्तर देण्यासाठी म्हणून हिंदू संस्कृतीचे गोडवे गाण्याच्या निमित्ताने वैदिक काळ कसा संपन्न व सुसंस्कृत होता हे दाखविण्याच्या उद्देशाने झालेले आहे. त्यामुळे खरोखरच सर्वसामान्य स्त्रीचे स्थान काय होते, याचा विचार झालेला नाही. त्या दृष्टीने हे पहिलेच पुस्तक असावे. आजच्या स्त्रीमनाची जडणघडण बदलायची असेल तर हा इतिहास समजून घेणे आवश्यक आहे.
please login to review product
no review added