तळागाळातल्या समाजाशी एक घट्ट नाते रक्तात रुजलेल्या अनिल अवचटांमधला सामाजिक कार्यकर्ता, त्या समाजातलाच एक माणूस होऊन जातो. त्यांची सुखदु:खे, समस्या जाणून घेता घेता मनोमनी तो विलक्षण अस्वस्थ होऊन जातो - त्या समस्यांच्या मुळाशी पोहोचण्याची धडपड करत राहतो. ‘कोंडमारा’ या शीर्षकातच सूचित होते ती घुसमट - दलितांवर होणारे अनेक प्रकारचे अत्याचार आणि त्या अत्याचारांना वाचा फुटूनही वर्षानुवर्षे अन्यायाखाली गाडून राहिलेल्या या दलित - वर्गाचे विविध हुंकार - त्यांच्या मनाचा ‘कोंडमारा’. कधी अत्याचार घडतो, कधी तो घडवला जातो. त्याच्या घटना बनतात नि त्या घटना बातम्या होतात. पण पुढे होते ते काय?... अनिल अवचटांना हाच प्रश्र्न वारंवार बेचैन करतो आणि एक शोध त्यांच्याकडून चालू होतो. त्या त्या घटनेचे धागेदोरे तपासात, त्या व्यक्तींच्या वाट्याला आलेल्या पिळवटून टाकणार्या वेदना-यातनांशी एकरूप होत, या सामाजिक कार्यकर्त्यामधला लेखक आपल्या लेखनातून या अत्याचारांचे वस्तुनिष्ठ रंग मांडत राहतो. मूकपणे साहत राहाव्या लागणार्या या वर्गाच्या अन्यायाला त्यांची लेखणी ‘बोलके’ करते. या माणसांच्या व्यथांना सहृदयतेने समजून घेत, त्यांच्यावर त्यांच्याच लोकांकडून, कधी उच्च जाती - जमातींकडून, सत्ताधार्यांकडून येणारे दबाव, ताण, त्यांतली गुंतागुंत आणि संघर्ष यांना शब्दबध्द करते. अत्याचारी प्रवृत्तीला प्रभावी लेखणीच्या सामर्थ्याने दिलेला हा शाब्दिक शह. त्यातून व्यक्त झालेला विषाद, आणि अत्याचार करणार्या वर्गाची जाणीवशून्य, हीन प्रवृत्ती...वाचताना अस्वस्थतेचा जीवघेणा अनुभव येतो - मती गुंग होऊन जाते...
please login to review product
no review added