जगभरातील सर्वसामान्य माणसांपासून विचारवंतांपर्यंत अगणित माणसांच्या मनावर अधिराज्य गाजवणाया ओशोंची प्रश्नोत्तरांच्या स्वरूपातील प्रवचनं ‘विद्रोही’ या पुस्तकात संकलित केलेली आहेत. ओशोंच्या दृष्टीनं विद्रोह हेच धार्मिक व्यक्तीचं व्यवच्छेदक लक्षण आहे. अध्यात्माचं शुद्ध रूप म्हणजेच विद्रोह, असं त्यांचं प्रतिपादन आहे. ओशो भूतकाळातील कोणत्याही धार्मिक परंपरेशी वा तात्त्विक विचारप्रणालीही संबद्ध नाहीत. त्यांच्या आगमनाने नव्या युगाची सुरुवात व्हावी, इतकी त्यांची विचारधारा स्वतंत्र आहे. त्यांच्या दृष्टीसमोरचा समाज हा कोणत्याही खासगी मालमत्तेला व लग्नसंस्थेला नाकारणारा समाज आहे. या समाजाचं चित्र रेखाटताना ते कठोरपणे आपल्याला आपल्या जुनाट, त्याज्य संस्कारांची जाणीव करून देतात. अपेक्षित स्थितीपर्यंत पोचण्यासाठी ध्यानाला ते एकमेव अग्रक्रम देतात. हा सारा आशय ओशो अतिशय सोप्या, प्रवाही भाषेत, मार्मिक उदाहरणं देत, कधी मिश्किलपणे, विनोदाची पखरण करत करत असा पटवून देतात, की ती प्रवचनं सहज संवाद बनतात. त्यांच्या द्रष्टेपणाची, प्रगाढअभ्यासाची, अफाट बुद्धिमत्तेची झेप जाणवून मती गुंग होत असतानाच त्यातील आशय वाचकांच्या मनावर आपसुख कोरला जातो.
please login to review product
no review added