आत्मचरित्रे ही सर्वसाधारणपणे आत्मसमर्थनार्थ लिहिली जातात, असे जयवंत दळवींचे मत होते. खरेखुरे आत्मचरित्र लिहिण्याचे धैर्य नसेल तर भल्या माणसाने आत्मचरित्र लिहू नये, असेही ते म्हणत असत. प्रस्तुतच्या पुस्तकात दळवींच्या आत्मपर लेखांचे विलोभनीय दर्शन घडते. मत्स्याहार प्रिय असलेले रसिक खवय्ये म्हणून त्यांचे दर्शन 'माझे खाणेपिणे माझा मत्सावत्यार' ' अनंताश्रम', 'भंडारी हॉटेल' यांसारख्या लेखांतून घडते. कुटुंबातले दळवी ' माझ्या कुटुंबात मी' मधून उभे राहतात. 'दादरचे दिवस', 'आठवणीतली वास्तू' यांसारखे लेख त्यांच्यातील व्रात्य मुलाची आठवण करून देतात. 'आपुले मरण पाहिले म्या डोळा' यांसारख्या लेखातून ते आपल्या मृत्यूकडे ज्या खेळकरपणे पाहतात, आणि ज्या विनोदी ढंगात पेश करतात, ते अविस्मरणीय आहे, नाट्यक्षेत्रातल्या स्वतःच्या पडेल पर्दापनावरही ते तेवढ्याच केळकरपणे लिहितात. 'धि वर्ल्ड इस लाईक धिस' हा युसिसमधील नोकरीच्या काळातील अधिकाऱ्यांविषयीचा लेख वैशिष्ट्यपूर्ण आहे. ' माझ्या साहित्यातील 'धर्म' व 'देहधर्म' , ' चक्र' शी नसलेला संबंध' या लेखांतून साहित्यिक दळवींचे दर्शन घडते. दळवींची शैली ही अत्यंत पारदर्शक आहे. दळवींच्या आयुष्यातील व्यक्ती-घटना-प्रसन्न या विषयींचे हे मार्मिक लेखन गजालीच्या स्वरुपात वाचकांसमोर उलगडत जाते आणि वाचक त्यात गुंतत जातो.
please login to review product
no review added