कधीकधी मी फार निरुत्साही होतो. खडकावर बेडके बसून राहावीत तशा लेखनकल्पना मनातच राहतात. आपण एक-एक म्हणता अनेक ओझी डोक्यावर घेऊन चालतो आहोत, अशी जाण मध्येच येते. सर्वात प्रथम लेखन, बाकी सर्व दुय्यम. त्याच्या वाटेत येणारी कोणतीही गोष्ट घट्ट मनाने बाजूला केली पाहिजे; पण तसे सामर्थ्य नसते आणि आपणच आपल्या शक्ती नासवून टाकतो. असा विचार मनात येतो,लेखक म्हणून आजवर जे मिळवले ते मोठे आहे, असे मला मनोमनी कधी वाटत नाही. तसे वाटले असते, तरी एका परीने बरे होते. भाबड्याला मिळते ती शांतता तरी मिळाली असती. मध्येच कधी मन उसळी मारते. उडी घेऊ वाटते. काय घडेल ते खरे!
please login to review product
no review added