डॉक्टर पाणेकर, प्रिया तेंडुलकर, प्रशांत-गौरी दामले ही मंडळी मला आयुष्याच्या अथल्यामधल्या कुठल्या ना कुठल्या टप्प्यांवर अचानक भेटली आणि राही अनिल बर्वे यांची भेट तर अगदी अलीकडची या प्रत्येक भेटीत आमच्यात संवाद झाला, असे मात्र नाही. कधी अगदी सुंदरसे धागे जुळले, तर कधी साधी ओळखही नसल्यासारखे पाठ फिरवून आम्ही आपापल्या वाटांनी निघून गेलो; पण कसे कुणास ठाऊक, कधी काही न मागतादेखील या सर्वांनीच आपापल्या परीने दुर्मिळ रत्नांसारखी काही मूल्ये माझ्या आयुष्याच्या पोतडीत अलगद ठेवून दिली आणि माझे आयुष्य संपन्न, समर्थ आणि चमकदार करून टाकले.आणि आश्चर्याची गोष्ट अशी, की जेव्हा कधी पराकोटीची निराशा किंवा अत्युच्च आनंदाच्या क्षणी मी हे संचित उघडून बघते तेव्हा त्यात अनेक नव्या नजरबंदी करणाऱ्या देवदुर्लभ तेजस्वी रत्न-स्फटिकांची भर पडलेली मला दिसते. कुणाला कळूही न देता, कोणत्याही श्रेय वा परतफेडीची अपेक्षा न करता, कोण कधी चोरपावलांनी येऊन माझ्यासाठी.... एकटीसाठी हे ठेवून गेले असेल? त्या झगमगणाऱ्या रत्नांच्या प्रभेने सगळा आसमंत उजळून निघालेला बघून मी विस्मयचकित होऊन जाते. त्या चकित झालेल्या क्षणांच्या कहाण्या म्हणजेच माझे हे लेख.
please login to review product
no review added