समाजाशी निगडित घडामोडींचा सखोल ऊहापोह करणारे आठ लेख ‘प्रश्र्न आणि प्रश्र्न...’मध्ये समाविष्ट आहेत : ‘पाणी आणि माती’, ‘पठार आणि खाणी’ या लेखांतून, त्यांचे जीवनातील स्थान, त्यांची जपणूक आणि उपयोजन यांचा विचार होतो... मध्यप्रदेशातील बस्तर भागातल्या जंगलाची बेबंद तोड ‘बस्तरचे अरण्यरुदन’मध्ये चित्रित होते. भारतातला मत्स्यव्यवसाय, त्यातल्या व्यावसायिकांचे प्रश्र्न, जागतिकीकरणाचे परिणाम यांचे विवेचन अनिल अवचट ‘मच्छिमार आणि समुद्र’मध्ये करतात....शहर पुण्यातल्या वाढत चाललेल्या कचरा - समस्येचे विदारक अंग ‘कचरायात्रा’त उघड होते. अस्तंगत होत चाललेल्या, तरीही आवश्यकतेमुळे तरून राहिलेल्या बलुतेदारी या खेड्यातल्या एके काळच्या भक्कम व्यवस्थेचे रूपान्तर ‘बलुतेदारी’त दिसते. आणि विडी-उद्योगासाठी लागणार्या तेंदूच्या पानांची तोड करणार्या, त्यांवर गुजराण करणार्या असंख्य कुटुंबांच्या प्रश्र्नांचा साधक-बाधक भाग, ‘तेंदूच्या पानांचा प्रश्र्न’मध्ये मांडला जातो. समूहहिताची आच अनिल अवचट यांच्या लेखनात इतकी तीव्र असते की, कोल्हापूरच्या ‘पंचगंगा’ नदीच्या प्रदूषणासंबंधी ते जेव्हा लिहितात तेव्हा न्यायालयालाही त्याची दखल घ्यावी वाटते. काही प्रश्र्नांची उत्तरे आपोआप मिळतात. काही प्रश्र्न प्रयत्नाने सुटतात. काही प्रश्र्न अनुत्तरित राहतात तर काही अनुत्तरित ठेवले जातात. एक व्यापक प्रश्र्नोपनिषद इथे उघडले जाते. अनिल अवचट सामाजिक समस्यांवर तळमळीने अविरत लिहीत आले आहेत. त्यातून त्यांची, एका जागृत, संवेदनशील कार्यकर्त्याची प्रतिमा उभी राहिलेली आहे. या प्रतिमेला पूरक अशी, त्यांच्यामधल्या निर्मितिशील लेखकाची साथ इथल्या लेखांना लाभते. आणि वस्तुनिष्ठ, परखड पण लालित्यपूर्ण लेखांची भेट ‘प्रश्र्न आणि प्रश्र्न...’ मधून रसिकांना मिळते.
please login to review product
no review added