"बागीतलं घर'मधील लेखन करताना लेखक बालपणीच्या आठवणीत रमलेला आहे. बालपणाविषयी नोस्टाल्जिक झालेला आहे, पण वर्तमानाचं, आजच्या वास्तवाचं भान विसरलेला नाही, हा या लेखनाचा महत्त्वाचा विशेष आहे. आठवणींच्या रूपानं आत्मचरित्र मांडणं ही परंपरा आधुनिक मराठीत प्रारंभापासूनच आहे. रमाबाई रानडे यांचं मराठीतले पहिलं आत्मचरित्र आठवणी मांडणारं आहे. अभिजात साहित्यकृती समजलं जाणारं 'स्मृतिचित्रे' हे लक्ष्मीबाई टिळक यांचं आत्मचरित्र आठवणीरूपच आहे. विनय यांचा हा चरित्र लिहिण्याचा प्रयत्न नाही, आठवणीतून बालपण पुन्हा अनुभवण्याचा प्रयत्न आहे. या आठवणी विविध घटना-प्रसंगाबद्दलच्या, विविध व्यक्तिंबद्दलच्या, विविध सण-विधी-समारंभांबद्दलच्या,निसर्गाच्या विविध अनुभवाबद्दलच्या आहेत. त्यामुळे या अनुभवकथनाला एकसुरीपणा आलेला नाही.
please login to review product
no review added