नारायण धारप हे नाव आताच्या वाचन करणार्या पिढीला नवीन असलं, तरीही आपल्या रहस्यमय लेखनाने त्यांनी एक काळ गाजवला होता. गेल्या शतकातील साठच्या दशकात त्यांनी लेखनाला प्रारंभ केला आणि त्यानंतर अखेरपर्यंत ते सातत्याने लिहीत राहिले आहेत. दूरदर्शन आणि इतर प्रसारमाध्यमांची फारशी चलती नव्हती, त्या काळात सामान्य वाचक अतिशय आतुरतेने त्यांच्या लेखनाची वाट पाहत असत. नारायण धारपांच्या कथा ‘भय’ या विकाराची अनेक रूपे घेऊन येतात. कथानकात पुढे काय घडणार याची उत्सुकता कायम ठेवत वाचकाला आपल्या लेखनात गुंतवून ठेवणे, रहस्यमय व गूढ पद्धतीने भयाच्या तावडीत माणसे कशी सापडतात, शारीरिक व मानसिक वेदना कशी भोगतात, भूत-पिशाच्च, क्रूर पीडा देणार्या जीवसृष्टीच्या काल्पनिक जगाचे अस्तित्व कसे जाणवते आणि दैवी शक्तीने, चमत्काराच्या कृपेने त्यातून ती कशी सुटतात याचे वर्णन अतिशय चित्तवेधक आहे. माणसाला नेहमीच कोणतेही रहस्य जाणून घेण्याची मुळातच उत्कंठा असते. जितके समाधान वाचनातून मिळते तितके दुसर्या कोणत्याही माध्यमातून मिळत नसल्यामुळे वाचनाकडे आकर्षित झालेली नवी पिढी रहस्यमय व गूढ कथेच्या शोधात असते. वाचकांची ही भूक भागविण्याचे काम नारायण धारपांचे साहित्य करते. एकूणच मराठी साहित्यात रहस्य व गूढतेचे दालन समृद्ध करणार्या लेखकात नारायण धारपांचे स्थान वरचे आहे. धारपांच्या अद्भुत घटनांचे तर्कातीत मनोव्यापारांचे खेळ वर्णन करणार्या या कथा वाचकांना एका जागेवर खिळवून ठेवतात, हे वेगळे सांगायला नको.
please login to review product
no review added