१९९९ साली प्रकाशित झालेल्या तसलिमा नासरिन यांच्या ‘आमार मेयेबेला’ (माझं कुवारपण) या आत्मकथनाने बंगाली साहित्यविश्वात खळबळ माजवली. एक अविस्मरणीय आत्मकथन म्हणून आता ते पुस्तक मान्यता पावले आहे. ‘उतोल हवा’ (उधाण वारा) हा त्याच आत्मकथनाचा दुसरा भाग आहे. या भागात तसलिमांच्या सोळा ते सव्वीस वर्षापर्यंतच्या वयाची कहाणी आहे. या पुस्तकातही आपल्याला त्यांच्या रोखठोकपणाचे व करुणेचे दर्शन होते. पण आता तसलिमा वयाने मोठ्या झाल्या आहेत. त्यांची भोवतालाकडे पाहण्याची दृष्टी आणखी तीक्ष्ण झाली आहे. अनुभवांचा परीघ आणखी विस्तृत झाला आहे. त्यामुळे तसलिमांची जडणघडण कशी झाली हे या पुस्तकात आणखी तपशीलवारपणे समजते. एका मागासलेल्या समाजात आणि कुटुंबात मोठ्या झालेल्या युवतीने कशा प्रकारे पुराणमतवादाची बंधने तोडून टाकली हे या पुस्तकात दिसते. त्यांचे प्रेमप्रकरण, त्यामधील आनंदवेदना, संबंधामधले चढउतार आणि शेवटी त्यातून बाहेर पडणे– हे सारे वाचताना वाचकांनाही खिन्नतेचा अनुभव येतो. तसलिमांचे गद्य काव्याच्या तेजाने झळाळणारे आहे. या धारदार आत्मकथनाचा मराठी अनुवाद समर्थ अनुवादक विलास गीते यांनी तितक्याच प्रत्ययकारीपणे केला आहे.
please login to review product
no review added