रंग सुखाचे... रंग सुखाचे कोणते; योगी संत-महंत सांगतात, त्या ज्ञानियांच्या सुखाचा रंग शुभ्रधवल, रविकिरणांसारखा; पण सर्वसामान्यांसाठी त्याच प्रखर शुभ्रतेतून सप्तरंगी इंद्रधनू साकारते. सुखाचे रंग अनेक, छटा वेगवेगळ्या. माणसं आणि त्यांच्या सुखाच्या कल्पना जाणून घ्यायचं मला जणू वेडच लागलं. सुखाचे मिळाले ते रंग घेऊन कुणी आपलं जगणं इतकं सुंदर बनविलं होतं की, मला त्या माणसांत आगळा कलाकार दिसू लागला. तर काहींनी, ‘हवे ते रंग’ मिळूनही ‘जगणं’ कुरूप केलं होतं. सुखाचे वेगवेगळे रंग पाहून मी तर हरखून गेले. नादावले. रंगबावरी झाले. वाटलं, हे सुखाचे रंग जरा जवळून पाहायला मिळाले, तर... ‘जगणं’ रम्य होऊन जाईल. सुरेख साकारता येईल. शोधता शोधता कळलं मानसशास्त्राच्या लोलकातून हे रंग नक्की पाहता येतील. तसे ते पाहिलेही. म्हटलं, याच विषयावर थोडं बोलावं, लिहावं, असं करताना ह्या सुखाच्या रंगांची आणखी ओळख होईल, जाणकारी वाढेल. जगण्यातील एकमेकांच्या कलात्मकतेची, रसिकतेची सहजवृद्धी होईल; कारण हा विषय सर्वस्पर्शी आणि प्रत्येकजण आपल्या परीने कलावंतच!
please login to review product
no review added