नारायण धारप यांनी गेल्या शतकातील साठच्या दशकात लेखनाला प्रारंभ केला आणि त्यानंतर शेवटपर्यंत ते निरंतर लिहीत राहिले. दूरदर्शन आणि इतर प्रसारमाध्यमांची भरभराट नव्हती, तेव्हा सामान्य वाचक अतिशय उत्कंठित होऊन त्यांच्या लेखनाची प्रतीक्षा करीत होता.नारायण धारप यांच्या कथानकाचा विषय हा 'भय' या विकाराशी बांधील आहे. कथानकात पुढे काय घडणार आहे याची उत्कं ठेवून वाचकाला आपल्या लेखनात गुंतवून ठेवतात, रहस्यमय व गूढ पद्धतीने भयाच्या पाशात व्यक्ती कशा येतात, शारीरिक व मानसिक वेदना कशा भोगतात, भूत-पिशाच्च, क्रूर पीडा देणाऱ्या जीवसृष्टीच्या काल्पनिक जगाचे अस्तित्व कसे जाणवते आणि दैवी शक्तीने, चमत्काराच्या कृपेने ती कशी सुटतात आणि कशी बळी पडतात याचं अतिशय विलक्षणरीत्या वर्णन येते.'चेटकीण' ही कादंबरीही अशा प्रकारच्या गूढतेने खच्चून भरलेली आहे. गजबजलेल्या वस्तीपासून दूर असणारी वास्तू. त्या वास्तूत अनाकलनीय घटना घडतात. या सर्व घटना मानवाच्या आकलनापलीकडे आणि आवाक्याबाहेरच्या आहेत. या वास्तूत एक एक व्यक्ती त्या अनाकलनीय शक्तीला कशी सामोरी जाते आणि कशी गडप होत जाते; पुढे असे घडणार आहे असे माहीत असूनसुद्धा! तर काही व्यक्ती सहीसलामत सुटतात आणि ती वास्तू पवित्र होते, पिशाच्च मुक्त होते.चित्तथरारक, रोमहर्षक, अकल्पित, गूढतेने; पण भयपटाला शोभावी अशी ही कादंबरी वाचकांना एका जागेवरच खिळवून ठेवण्यात यशस्वी होते, हे वेगळे सांगायला नको!
please login to review product
no review added