हेलकावे घेणाया पालखीचा गोंडा धरून राजे पालखीत बसले होते. पालखीवर झाकलेल्या अलवानामुळे राजांना काही दिसत नव्हतं. फक्त बाजींचा आवाज कानावर येत होता, ‘‘चला’’ चला! कुठं जायचं? एका माणसाच्या जिवासाठी धावायचं कुठवर? बाजी! कशासाठी हे कष्ट घेता? कोणाच्या स्वार्थापायी? आणि तेही एका माणसाच्या जिवापायी? कोणाच्या सत्तेनं आम्ही या माणसांना गुंतवलं? कोणत्या अधिकारानं? जीवनात अखेरचं मोल असतं ते स्वत:च्या जीवाचं! मग त्या जीवाच्या कवड्या यांनी आम्ही मांडलेल्या पटावर का उधळाव्यात? कसल्या आणि कुणाच्या भरवशावर? बाजी, फुलाजी तुम्ही स्वामीकार्यासाठी का ह्या अवघड वाटचालीत सामील झालात? कोणत्या त्यागापायी? हे व्हावं ही तो श्रींची इच्छा आहे असं आम्ही म्हणालो. पण हा महाचंडिकेचा होम धडाडत असता त्याचं पौरोहित्य आमच्या हाती का सुपुर्द केलंत? यातून खरं काही साधणार आहे का? या पालखीचा वीट येतो! नशिबानं या संकटातून पार पडलोच तर... बाजी, पालखीचा मान तुम्हाला देऊ! त्यावेळी तुम्हाला कळेल ही पालखी केवढं सुख देते ते!
please login to review product
no review added