तानाजी राऊ पाटील हे एक हस्तलिखित घेऊन सात-आठ वर्षापूर्वी माझ्याकडे आले. आनंद यादवांच्या साहित्याचा पीएच. डी. साठी अभ्यास करीत होते. त्यांनी एक कादंबरी लिहिली होती आणि ती प्रसिद्धीसाठी कुणाकडे पाठवावी या संबंधी त्यांना माझा सल्ला हवा होता. मी ते हस्तलिखित ठेऊन घेतले. वाचून झाल्यावर पत्र लिहिन असे सांगितले. ते हस्तलिखित मी जसजसे वाचत गेलो, तसतसा मी आनंदीत आणि आश्चर्यचकित होत गेलो. जंगलातल्या झाडाझुडपांतून वाट काढीत जात असताना अचानक एक निर्मळ पाण्याचे, निळेशार, उन्हात चकाकणारे तळे दिसावे आणि आपला उर भरून यावा तसे वाटत गेले. या कादंबरीचे नाव त्यांनी 'आभाळ' असे दिले होते. कथा तशी साधीच, शेतावर काम करणाऱ्या नुकतेच लग्न झालेल्या नवरा-बायकोची, त्यांनी जमिनीच्या तुकडयात चालवलेल्या काबाड कष्टाची, एकमेकांवरच्या नव्हाळीच्या मायेची... त्याला नुसतेच प्रेम म्हणणे कमीपणाचे ठरले असते. बदलत जाणाऱ्या ऋतूंची, पावसाळा, थंडी, उन्हाळा या मोसमांचा अनुभव पचवणाऱ्या शेताची आणि या गरीब जोडप्याची ही कहाणी मला आदिम अवस्थेतील जीवन जगणाऱ्या जगातल्या पहिल्या स्त्री-पुरुषाची कहाणी वाटली. आभाळाइतकी गहन, गहिरी, निलेप, अनेक योजने दूर असलेली तरी हरघडीला सोबत करणारी. नितळ तळ्याइतकी निर्मळ, अथांग, रमणीयतेच्या आद्य रुपासारखी. मनाचे कमळ डोलायला लावणारी...
please login to review product
no review added