...कथाबीजं दाही दिशांनी मनात येऊन पडतात – प्रत्यक्ष अनुभवलेल्या एखाद्या भावनेच्या छटेपासून, तो सहजगत्या कानांवर पडलेल्या एखाद्या चारदोन ओळींच्या घटनेपर्यंत. अशा अनेक अनुभवांत कथाबीजं लपलेली असतात; पण ती सारीच फुलवण्याचं सामथ्र्य पुष्कळांच्या अंगी नसतं. मीही त्याला अपवाद नाही. झोपलेलं माणूस एकदम काहीतरी टोचल्यामुळं जागं व्हावं, त्याप्रमाणं ज्या अनुभूतीनं संवेदना सचेतन होते आणि कल्पनाभावनाविचार यांच्या त्रिवेणी संगमानं न्हाऊ लागते, तीच पुढं स्वत:ला हवं तसं कथारूप धारण करू शकते. अशा रीतीनं गेली पन्नास वर्षं मी कथापंढरीचा वारकरी राहिलो आहे. पहिल्या दहावीस वर्षांत मी तरुण वारकरी होतो. चालण्यात काय किंवा अभंग आळवण्यात काय, माझ्या ठिकाणी दुर्दम्य उत्साह होता. आता त्या उत्साहाची अपेक्षा करणं सृष्टिक्रमाला धरून होणार नाही. तथापि, गेल्या काही वर्षांत ज्यांचा कथारूपानं माझ्या हातून आविष्कार झाला, असे काही अनुभव या संग्रहात प्रतिबिम्बित झाले आहेत.... या संग्रहातील कथांनी कुणाचं थोडंसं सात्विक रंजन केलं, कुणाला थोडा वाङ्मयीन आनंद दिला, एखाद्याला त्यात दिलासा सापडला, तर त्या लिहिताना मला जो आनंद झाला; तो केवळ वैयक्तिक नव्हता, या जाणिवेनं माझं लेखन सफल झालं, असं मी मानेन.’
please login to review product
no review added