तरुण स्त्रीपुरुषांनी प्रेमजीवनात शरीरसुखाचा भाग अतिशय महत्वाचा मानला पाहिजे, परस्परांच्या आनंदसंवर्धनाकरता आपण एकमेकांचे हात हातात घेतले आहेत, याचा त्यांनी स्वतःला कधीही विसर पडू देऊ नये, आयुष्याच्या प्रवासातली खरीखुरी मौज असल्या सोबतीतच आहे, इत्यादी गोष्टी सांगितल्या जात असल्या, तरी केवळ कामतृप्ती हे संसाराचे कधीच ध्येय होऊ शकत नाही. आकाशातल्या चंद्राला हात लावण्याच्या धडपडीत माणसाचे पृथ्वीवरले पाय सुटले, तर तो तोंडघशी पडतो. तो चंद्र योग्य वेळी अनेकांच्या हाती लागतो; नाही, असे नाही; पण त्याचा लाभ संसाराच्या सुरवातीला होत नाही. दहावीस वर्षे संकटे आणि सुखे यांची चव जोडीने घेतल्यावरच त्या चांदण्याची वृष्टी होऊ लागते. त्या दृष्टीने उदात्त प्रीती हा शुक्ल पक्षातला चंद्र नाही; तो वद्य पक्षातला आहे.
please login to review product
no review added