बाप-लेक हे नातं मुलभूत नि महत्वाच; पण तरीदेखील ते दुर्लक्षितच राहिलेलं नातं. माय-लेक या नात्यासारखं ते खरं तर संवादी असायला हवं .परंतु बहुतेकदा या नात्याचे रंग ताठरलेले, अति शिस्तीन आक्रसलेले, विन्मुखलेले असेच दिसतात. सामाजिक दडपणामुळ वा जैविक घटकामुळं या नात्यात एका अंतराची अदृश्य लक्ष्मणरेषा अधोरेखित केली गेलेली असतेच का? कि पुरुषप्रधान संस्कृतीमुळत्यातल्या मैत्रीचा मोकळेपणा गुदमरला जात असावा? लेकीच्या व्यक्तिमत्वविकासाच्या आलेखात, तिच्या पालनपोषणापलीकडे मानसिक, बौद्धिक जडणघडणीत वडील आपली भूमिका अधिकतर तिचा मित्र बनून कितपत पणाला लावत असतो? खुद्द मुलीला आपल्या वडिलांकडून त्यांच्या कर्त्यवपालानापलीकडे काही अपेक्षा, आकांक्षा ठेवण्याचा अधिकार असतो? मराठी साहित्यक्षेत्रात या नात्याचा सामाजिक दृष्टीतून परामर्श घेऊन या नातेबंधाच त्रिमितीदर्शन, अवलोकन मांडण्याचा प्रयत्न झालेला नाही. हे जाणवून पद्मजा फाटक, दीपा गोवारीकर आणि विद्या विद्वास या तिघींनी बापलेकी हा प्रकल्प अभ्यास म्हणूनच निवडला आहे. या प्रकल्पात विविध क्षेत्रांतील मान्यवर बाप आणि लेकी यांची शब्दचित्रं आहेत. ही शब्दचित्रं, तशी बाप-लेक या नात्याची पारदर्शी प्रतिबिंबही. सखोल तितकीच हृदयस्पर्शी, मनोरम तितकीच प्रामाणिक म्हणून अंतर्मुखही करणारी... अर्थात ती केवळ ललित लेखांची रूप नाहीत. त्यातून हाती आलेल्या निरीक्षणातून पारंपरिक भारतीय कुटुंब-व्यवस्थेत बापाचं स्थान कोणत होतं आणि आजच्या बदलत्या काळाच्या मर्यादित झालेल्या कुटुंब-व्यवस्थेत ते कसं असावं याचाही वेध आहे. ज्या सामाजिक चौकटीमध्ये आणि ज्या कुटुंब-व्यवस्थेत हे नात रुजलं त्याचा आणि या नात्यात परिस्थितीनं निर्माण होणाऱ्या मानसिक गुंतागुंतीचा-विकृतिसदृश मानसशास्त्रीय संशोधनात्मक वेध घेण्याचाही प्रयत्न आहे. असा प्रयत्न मराठी साहित्यात प्रथम होत असावा म्हणूनही या ग्रंथाचं महत्व मोठं आहे.
please login to review product
no review added