रंगमंचीय प्रवासात भेटलेली माणसे, आलेले अनुभव, प्रत्येक व्यक्तिरेखेचा केलेला अभ्यास, त्या साकारताना आलेल्या अडचणी व त्यावर केलेली मात या सगळ्याबद्दल अमरीश पुरी यांनी विस्ताराने व काहीशा तटस्थपणे लिहिले आहे. स्वस्तुती टाळून वस्तुनिष्ठपणे या वाटचालीकडे ते पाहताना दिसतात. अमरीशजींच्या या आत्मकथनात नाटय़-चित्रपटांतील गुणी अभिनेते, दिग्दर्शक यांच्याबद्दलची मनमोकळी गुणग्राही प्रशंसाही आढळून येते. इब्राहिम अल्काझी, पं. सत्यदेव दुबे, श्याम बेनेगल, गोविंद निहलानी, अमिताभ बच्चन, स्टीव्हन स्पिलबर्ग, रिचर्ड अॅटनबरो यांच्या गुणांची, त्यांच्या वैशिष्टय़ांची चिकित्सा अमरीशजींनी या पुस्तकात केलेली आहे.चित्रपट क्षेत्रातील या प्रवासात त्यांना अपयशाला सामोरे जावे लागले नसले तरी काळानुरूप चित्रपटांतील तंत्र-मंत्रांतील बदलांना खचितच सामोरे जावे लागले. तीन पिढय़ांच्या चित्रपटकर्त्यांशी त्यांचा संबंध आला. त्यांच्याबद्दलची निरीक्षणे, त्यांची काम करण्याची विशिष्ट पद्धती, त्यांच्यासोबतचे बरे-वाईट अनुभव अमरीश पुरी यांनी या आत्मकथनात विशद केले आहेत. चंद्रकांत भोंजाळ यांनी या आत्मकथनाच्या यथातथ्य मराठी अनुवादाचा यशस्वी प्रयत्न केलेला आहे. पुस्तकात शेवटी दिलेली अमरीश पुरी यांच्या नाटक व चित्रपटांची सूची तसेच पुरस्कारांची यादी संदर्भासाठी उपयुक्त ठरणारी आहे.एक अभिनेता म्हणून नाही, तर एक सज्जन, सौम्य प्रकृतीचा विचारी माणूस म्हणून अमरीश पुरी यांचे व्यक्तिमत्त्व पूर्णांशाने या आत्मकथनात व्यक्त झाले आहे.
please login to review product
no review added