मराठीतील ऎतिहासिक कादंबरीकारांनी भूतकाळाचा वेध घेण्याचा समर्थ प्रयत्न आजवर केला आहे. या प्रयत्नातील एक नवा टप्पा म्हणजे ना. सं. इनामदारांचया एकापेक्षा एक सरस अशा सात कादंब-या ऎतिहासिक वास्तवाच्या मूळ गाभ्यालाच हात घालून भेदक व्यक्तिचित्रण करणे हे त्यांचे अजोड कौशल्य. भारतीय इतिहासाला वळण मिळत असताना शोकात्म रंग प्राप्त झालेली व्यक्तिमत्त्वे नेमकी हेरून त्यांच्या अंतरंगाचा छेद घेण्यात त्यांची लेखणी गुंतते. शेवटच्या बाजीराव हे एक असेच व्यक्तिमत्व. मराठी राज्याचा पेशवा. ध्येयाचया ता-याचा वेध घेऊन शिवाजी राजांनी मराठी राज्याची ही डौलदार नौका नियतीच्या अथांग सागरात प्रथम लोटली. बाळाजी विश्वनाथापासून एकापेक्षा एक कुशल हातांनी या नौकेचे सुकाणू सांभाळले होते. नौकेचा प्रवास इच्छित दिशेने चालू होता. काही काल तर या नौकेचे विशाल सागरावर आपले अधिराज्य स्थापन केल्याचा भास होत होता पण पौर्णिमेनंतर अमावस्या येणे हा सॄष्टीचा क्रम आहे. नौकेच्या मार्गात विशाल खडक मधूनच डोकावू लागले. हे शुभ्र खडक कधी भीती उत्पन्न करीत. अक्राळविक्राळ लाटा उठू लागल्या. याचवेळी सागराच्या शांत लाटांतही चलबिचल सुरू झाली. मार्ग अस्पष्ट झाला. नौका खडकावर आपटून फुटले की काय अशी शंका जाणत्यांना अस्वस्थ करू लागली. या वेळी सुकाणू होते दुस-या बाजीराव पेशव्यांच्या हातात. त्या हातामागे सामर्थ होते पाच पिढयांचे. पण याचवेळी नियतीने या मंत्रातले सामर्थ काढून घेतले. तेज मंद झाले व आपल्या मंत्रावेगळया झालेल्या दुबळया हाताने बाजीराव नौकेचे सुकाणू सांभाळण्याचा आटोकाट प्रयत्न करू लागला. त्या प्रयत्नांची कहाणी म्हणजे ’मंत्रावेगळा’ ही ऎतिहासिक कादंबरी. फुटून सागरतळी गेलेल्या या नौकेचे काही अवशेष तरंगत तरंगत किना-यास लागले. दीडशे वर्षानंतर लेखक हे अवशेष हातात घेऊन सागरकिनारी उभा आहे. प्रतिभेचे पंख लावून तो एकेक घटना अनुभवतो आहे. ’मंत्रावेगळा’ ही मराठींतील सर्वोत्कॄष्ट ऎतिहासिक कादंबरी आहे असा निर्वाळा टीकाकारांनी दिला आहे. झेप, झुंज, राऊ, शहेनशहा, शिकस्त व राजेश्री हया इनामदारांच्या इतर कादंब-या आहेत. तसेच इनामदारी व धांडोळा हे लेखसंग्रह आहेत.
please login to review product
no review added