मातृत्वाचा ध्यास ही स्त्रीची एक आदिम प्रेरणा आहे. आई झाल्याशिवाय आपल्या जीवनचं सार्थक झाल्याचं समाधान स्त्रीला मिळत नाही. समाजाचाही तीच धारणा राहिली आहे. पण त्यामुळे निसर्गच याबाबतीत जिच्यावर रुसला आहे अशा स्त्रीचं जगणं कर्मकठीणच होऊन बसतं. त्यावर तोडगा काढण्यासाठी जेव्हा तंत्रज्ञान पुढं सरसावलं तेव्हा त्याचं स्वागतच झालं. पण जसजशी या तंत्रज्ञानाची घोडदौड सुरू झाली, नित्यनूतन नवीन आविष्कार साकार होऊ लागले तसतशा या तंत्रज्ञानाच्या वापरापोटी उद्भवणाऱ्या वैयक्तिक, सामाजिक, आर्थिक, नैतिक आणि कायद्याच्या समस्यांनीही डोकं वर काढलं. काही बाबतीत तर उग्र रूप धारण केलं. त्या समस्यांनी स्त्रीयांच्याच नव्हे तर त्यांच्या पुरुष जोडीदारांच्या, किंबहुना सर्व कुटुंबाच्याच भावजीवनात अभूतपूर्व वादळं उठू लागली. यापुढंही ती उठत राहणार आहेत. मन सुन्न करणारं रूप धारण करणार आहेत. अपत्यप्राप्ती, संतानसुख हे केवळ दोन जीवांच्या झिम्माफुगडीवर आजवर अवलंबून होतं. त्यांचीच आता तीन पायांची शर्यत झाली आहे.
please login to review product
no review added