केवळ तेवीस वर्षं वय असलेल्या भगत सिंग यांना ब्रिटिश सरकारने फाशी दिली खरी, पण 'माणूस गेला तरी, त्याचा विचार मरत नाही' ही उक्ती भगत सिंगांच्या बाबतीत तंतोतंत खरी ठरली. एवढंच नव्हे, तर त्यांच्या बलिदानाने स्वातंत्र्य-चळवळीची ज्वाला अधिकच पेटून उठली. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रकाशात आलेल्या भगत सिंग यांच्या साहित्याचा अभ्यास करून, आणि प्रकाशात न आलेल्या कागदपत्रांचा शोध घेऊन, संशोधन करून ज्येष्ठ व विख्यात पत्रकार, लेखक कुलदीप नय्यर यांनी हे चरित्र लिहिलं आहे. यात भगत सिंग यांचे विचार, त्यांच्यावर मार्क्स, लेनिन आदी क्रांतिकारक विचारवंतांचा असलेला प्रभाव, त्याबद्दलची त्यांची मतं, आणि त्यांनी पाहिलेलं 'समाजवादी, धर्मनिरपेक्ष भारता'चं स्वप्न आदी गोष्टींचं नय्यर यांनी अभ्यासपूर्ण विवेचन केलं आहे. भगत सिंग यांच्यावर चालवण्यात आलेल्या खटल्याचं यात तपशीलवार वर्णन असून हंस राज व्होरा यांच्या माफीचे साक्षीदार होण्याबाबतचे तपशीलही प्रथमच प्रकाशात आले आहेत. तसंच यात महात्मा गांधींच्या अहिंसात्मक तत्त्वज्ञानाबद्दलचे भगत सिंग यांचे विचारही मांडण्यात आले आहेत. भगत सिंग यांची फाशी टाळण्यासाठी महात्मा गांधींनी कोणते प्रयत्न केले, हेही नय्यर यांनी यात स्पष्ट केलं आहे. देशासाठी प्राणांची आहुती देणार्या एका स्वातंत्र्यसैनिकाची धगधगती क्रांतिगाथा - शहीद!
please login to review product
no review added