"प्रस्तुत पुस्तकातल्या सर्व व्यक्ती व प्रसंग काल्पनिक आहेत. प्रत्यक्षातल्या व्यक्तीशी अगर प्रसंगांशी साम्य आढळल्यास तो योगायोग मानावा." अशी एक पळवाटवजा सूचना पुष्कळ नाटक-कादंबर्यांत असते. ह्या पुस्तकातल्या लेखात आलेले प्रसंग काल्पनिक असले तरी व्यक्ती काल्पनिक वगैरे नाहीत. वास्तवातल्याच आहेत. आता त्यांच्यापैकी बर्याच जणांना लाभलेलं मोठेपण अवास्तव आहे ही गोष्ट निराळी. तेव्हा त्या लेखात आलेल्या व्यक्तींचे प्रत्यक्षातल्या माणसांशी वाचकांना साम्य आढळले तर तो अकल्पित योगायोग वगैरे मानू नये. अतिशयोक्ती हे विनोदाचे महत्त्वाचे अंग मानले जाते. पण ह्या नेतेमंडळींची वक्तव्ये आणि कृती ह्यातली अफाट विसंगती पाहिल्यावर कितीही अतिशयोक्ती केली तरी थिटीच पडेल अशी भीती वाटते. ह्या व्यक्तीच आता कल्पनेतून वास्तव्यात उतरलेल्या चालत्या-बोलत्या व्यंगचित्रांसारख्या दिसायला लागल्या आहेत. ह्या पात्रांमुळे सार्या सार्वजनिक जीवनाचंच एक विराट प्रहसन झालं आहे. ह्या नित्य नव्या ढंगात चाललेल्या प्रहसनाच प्रहसन कसे लिहायचे ? बरे, सतत खुर्चीबाजीत दंग असलेल्या ह्या भिडूंचे आणि त्यांच्या आचार, विचार आणि उच्चाराच्या लीळांचे रंग हे तेरड्या-सरड्यालाही लाजवणारे. त्यामुळे त्यांच्या क्षणोक्षणी बदलत्या कर्तृत्वाची चित्रेही रांगोळीसारखी फुंकरीसरशी उडून जाणारी. त्यातून पब्लिकची आठवणही फारशी टिकाऊ नसते. त्यामुळे तात्कालिक राजकीय संदर्भ असलेले हे लेखन वर्तमानपत्री लिखाणासारखे. यातले बरेचसे लेख महाराष्ट्र टाइम्समधून प्रसिध्द झाले आहेत. असल्या अल्पजीवी व्यंग-लेखांच्या पानांची जुडी बांधावी की बांधू नये हेही ठरवता येईना. वास्तविक यापूर्वीच तराजूवत तोलून रद्दीवाल्यांनी त्यांचं मूल्यमापन केलं आहे. आता पुस्तकरूपाने ते लेख आल्यावर रद्दीवाल्यांना पुन्हा एकदा पर्वणी आली असं न वाटो हीच इच्छा. मधुकाका कुलकर्णी ह्यांनी या लेखांना ग्रंथरूप द्यायची जोखीम पत्करल्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार.
please login to review product
no review added